रिक्षा भाडे नाकारण्याच्या तक्रारींचीही दखल; बेशिस्त वाहनचालकांना दणका ३६ वाहनांवर कारवाई
साईमत /डोंबिवली/ प्रतिनिधी :
शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक आणि रिक्षाचालकांकडून प्रवाशांना भाडे नाकारण्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली वाहतूक विभाग आणि कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त तपासणी मोहीम राबविली. रविवारी सकाळपासून डोंबिवली पूर्व व पश्चिम रेल्वे स्थानक परिसरासह शहरातील विविध भागांत करण्यात आलेल्या या कारवाईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३६ वाहनचालकांवर ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून रिक्षाचालकांकडून प्रवाशांचे भाडे नाकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. विशेषतः जवळचे भाडे नाकारून अधिक अंतराच्या आणि जास्त रकमेच्या प्रवाशांना प्राधान्य दिले जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. या प्रकाराला आळा घालावा, तसेच कामावरून परतणाऱ्या प्रवाशांना सायंकाळच्या गर्दीच्या वेळी सहज रिक्षा उपलब्ध व्हाव्यात, या मागणीसाठी संतप्त प्रवाशांनी केळकर रस्ता येथील रिक्षा वाहनतळावर ठिय्या आंदोलन केले होते.
या आंदोलनाची दखल घेत डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे यांनी आंदोलनकर्त्या प्रवाशांची भेट घेतली होती. रिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. तसेच जवळचे भाडे नाकारून दूरचे व अधिक रकमेचे भाडे स्वीकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी वाहतूक पोलिसांना दिल्या होत्या.
दरम्यान, केवळ आंदोलनानंतर काही दिवस कारवाई करण्याऐवजी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सातत्याने कारवाई करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे आणि कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभाग आणि आरटीओच्या पथकाने डोंबिवली पूर्व तसेच पश्चिम भागात विविध ठिकाणी वाहनांची तपासणी केली.
या संयुक्त मोहिमेत वाहनचालकांकडून करण्यात येणाऱ्या विविध वाहतूक नियमभंगांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर घटनास्थळीच ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण ३६ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे यांनी दिली.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तसेच प्रवाशांना त्रास देणाऱ्या रिक्षाचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा यापुढेही नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
