चंद्रहास हॉटेलमध्ये दारू पिण्यास मनाई केली म्हणून व्यावसायिक महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला हनुवटीजवळ गंभीर दुखापत, हॉटेल व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनाही मारहाण
साईमत /डोंबिवली/ प्रतिनिधी :
हॉटेलमध्ये दारू पिण्यास मनाई करून बाहेर जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून तिघांनी हॉटेल व्यावसायिक महिला, तिचे पती, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेतील टाटा पॉवर परिसरातील चंद्रहास हॉटेलमध्ये घडली. यावेळी टोळक्यातील एका व्यक्तीने धारदार शस्त्राने हॉटेल व्यावसायिक महिलेच्या हनुवटीजवळ वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
स्नेहल विनय राऊत या आपल्या वडिलांसोबत हॉटेलच्या व्यवस्थापनाचे काम पाहतात. गेल्या आठवड्यात रात्री सुमारे अकराच्या सुमारास त्या हॉटेलमध्ये हिशेब तपासण्यासाठी गेल्या होत्या. हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळील रोखपाल मंचकावर त्या बसलेल्या असताना चार तरुण हॉटेलमध्ये आले. त्यांना हॉटेलमध्ये दारू प्यायची होती. मात्र, काही दिवसांपूर्वी याच तरुणांनी दारू पिऊन बिल देण्याच्या कारणावरून हॉटेलमध्ये गोंधळ घातला होता. त्यामुळे राऊत यांनी त्यांना हॉटेलमध्ये दारू पिण्यास स्पष्टपणे मनाई केली आणि बाहेर जाण्यास सांगितले.
दारू पिण्यास मनाई केल्याने संतप्त झालेल्या तरुणांनी राऊत यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती चिघळू नये म्हणून राऊत यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच संबंधित तरुण तेथून निघून गेले.
त्यानंतर रात्री पावणे एकच्या सुमारास हॉटेलमध्ये आवराआवरीचे काम सुरू असताना याच तरुणांसह दोन महिला आणि दोन मुले पुन्हा हॉटेलमध्ये आली. त्यातील एका महिलेने स्नेहल राऊत यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर टोळक्याने हॉटेल व्यवस्थापक सिद्धार्थ देसाई यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
व्यवस्थापक देसाई यांना वाचविण्यासाठी स्नेहल राऊत यांनी मध्यस्थी केली असता टोळक्यातील एका व्यक्तीने जवळील धारदार शस्त्राने त्यांच्या हनुवटीजवळ वार केला. या हल्ल्यात राऊत यांच्या हनुवटीजवळ गंभीर दुखापत झाली. हा प्रकार पाहून त्यांचे पती विनय राऊत यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही टोळक्याने मारहाण केली.
दरम्यान, हॉटेल कर्मचाऱ्यांना पोलिसांना बोलावण्यास सांगण्यात आल्यानंतर संतप्त टोळक्याने राऊत दाम्पत्यासह कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव त्रिशांत साळवे असून, त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि बहीण असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हल्ल्यात जखमी झालेल्या स्नेहल राऊत यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून, हल्लेखोरांचा शोध आणि घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
