तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी;सुरक्षा भिंत नसल्याने तापी पुलावर वारंवार अपघात तरी प्रशासनाचे दुर्लक्ष?
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी :
जळगावहून चोपड्याकडे जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने विदगाव येथील तापी नदीच्या पुलाजवळ कार थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. सर्व प्रवासी चोपडा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील प्रवासी जळगावहून चोपड्याकडे जात होते. मध्यरात्री सुमारे तीन वाजता विदगाव येथील तापी नदीच्या पुलाजवळ आल्यानंतर चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव कार रस्त्याच्या कडेला जाऊन थेट तापी नदीच्या पात्रात कोसळली. अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून कारमधील प्रवाशांना बाहेर काढले. या घटनेत तीन ते चार जणांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
मध्यरात्रीच्या वेळी घडलेल्या या अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नागरिकांनी प्रसंगावधान राखून वेळीच मदत केल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. नदीपात्रात कोसळलेली कार बाहेर काढण्यासाठी सकाळी सुमारे दहा वाजता क्रेन घटनास्थळी आणण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्याचे काम सुरू असताना पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत होऊन वाहनधारकांना कोंडीचा सामना करावा लागला.
दरम्यान, या अपघातामुळे विदगाव येथील तापी नदी पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी अशाच स्वरूपाचा भीषण अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत एका महिला आणि एका बालकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतरही पुलाच्या धोकादायक भागात पुरेशा सुरक्षा उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तापी नदीच्या पुलालगत मजबूत संरक्षण भिंत, लोखंडी सुरक्षा कठडे किंवा वाहनांना नदीपात्रात जाण्यापासून रोखणारे प्रभावी अडथळे नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यास वाहन थेट नदीपात्रात कोसळण्याचा धोका कायम आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या ठिकाणी धोका अधिक वाढत असल्याने प्रशासनाने केवळ अपघातानंतर कारवाई करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वारंवार होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेऊन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तापी नदी पुलाची तातडीने पाहणी करावी, अशी मागणी होत आहे. पुलाच्या धोकादायक भागात मजबूत संरक्षण भिंत, लोखंडी सुरक्षा कठडे तसेच आवश्यक दिशादर्शक आणि सावधानतेचे फलक बसवावेत, अशी अपेक्षा वाहनधारक व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.
