मुलीचा पाठलाग, अश्लील चाळे, आणि चाकूचा धाक एकास अटक पोलिसांची धडक कारवाई
साईमत /यावल / प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात ११ वर्षीय अल्पवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य करून तिला चाकूचा धाक दाखविल्याच्या आरोपावरून ३५ वर्षीय संशयित आरोपीविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याने पुढील अनुचित प्रकार टळला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट रोजी रात्री साडेसातच्या सुमारास यावल शहरातील एका घरासमोर ११ वर्षीय मुलगी आपल्या आजीकडे गेली होती. यावेळी शेजारी राहणाऱ्या शेख इमरान (वय ३५) याने मुलीसमोर उभे राहून अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. तसेच चाकूचा धाक दाखवून तिच्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखविल्याचे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संशयित आरोपी मुलीच्या शाळेतही तिचा पाठलाग करून तिला पाहत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून यावल पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यासह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन व त्यांचे सहकारी करीत आहेत. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कायदेशीर कारवाई केल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली.
