साईमत वृत्तसेवा
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना मोठे उधाण आले आहे. “मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय,” असे त्यांनी सहजपणे व्यक्त केलेले उद्गार अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले. मात्र, त्याच भाषणात त्यांनी जनतेच्या प्रेमामुळे आणि विकासाची जबाबदारी लक्षात घेऊन अधिक जोमाने काम करण्याचा निर्धारही व्यक्त केला. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे निवृत्तीची घोषणा म्हणून नव्हे, तर दीर्घकाळाच्या सार्वजनिक जीवनातील भावनिक प्रतिक्रिया म्हणून पाहिले जात आहे.
‘२४ वर्षांचा प्रवास… आता कंटाळा आलाय’
बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “मी वयाच्या २४व्या वर्षापासून सार्वजनिक जीवनात काम करत आहे. आता मी ४८ वर्षांची झाले असून सलग २४ वर्षे याच रस्त्यांवरून, याच लोकांसाठी काम करत आहे. कार्यक्रमाला येताना रस्त्याच्या कामामुळे खडतर प्रवास करावा लागला. तेव्हा माझ्या पीएला मी सहज म्हटलं की, आता मला कंटाळा आलाय… राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय.”
त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना वेग आला. विविध स्तरांवर त्यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्क सुरू झाले.
‘जनतेचा उत्साह पाहून नव्याने ऊर्जा मिळाली’
मात्र, त्यानंतर लगेचच पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात जनतेच्या विश्वासाला आणि विकासाच्या जबाबदारीला प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.
त्या म्हणाल्या, “कार्यक्रमात आल्यावर गरीब कुटुंबातील मुलांच्या डोळ्यातील आशा आणि जनतेचा उत्साह पाहिला. तेव्हा जाणवलं की आपलं काम अजून संपलेलं नाही. लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही, तर जनतेच्या विकासासाठी आहे. हे पद, ही ताकद आणि ही जबाबदारी प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवण्यासाठीच आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विकासकामांसाठी अधिक जोमाने काम करणार आहे.”
या विधानामुळे त्यांच्या निवृत्तीच्या वक्तव्यामागील भावनिक संदर्भही स्पष्ट झाला.
धनंजय मुंडेंच्याही वक्तव्याची रंगली चर्चा
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचीही राज्यभर चर्चा रंगली आहे. परळीतील एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या राजकीय पुनरागमनाबाबत सूचक संकेत दिल्याचे मानले जात आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, “मी नियमित जीम करत आहे. माझं वजनही कमी झालं आहे. तसंही सर्वच क्षेत्रात आपलं वजन कमी झालं होतं. पण येणारा काळ आपलाच आहे आणि त्या काळासाठी फिट राहणं गरजेचं आहे. गेल्या दीड वर्षात अनेक मित्र भेटल्यावर तब्येतीची चौकशी करत होते. ते ऐकून मी ठरवलं की आता चमत्कार करून दाखवायचाच.”
त्यांच्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
राजकीय वर्तुळात चर्चांना वेग
एका बाजूला पंकजा मुंडे यांचे निवृत्तीबाबतचे भावनिक वक्तव्य आणि दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांचे पुनरागमनाचे संकेत, या दोन्ही घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी काळात या दोन्ही नेत्यांच्या राजकीय भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले असून त्यांच्या पुढील निर्णयांकडे राजकीय निरीक्षकांचे विशेष लक्ष राहणार आहे.
