साईमत न्यूज नेटवर्क –
अमरावती : अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) कारवाई कोणत्याही व्यावसायिकाला किंवा व्यवसाय चालकाला त्रास देण्यासाठी नसून, नागरिकांना दर्जेदार, शुद्ध आणि सुरक्षित अन्न व औषधे उपलब्ध करून देण्यासाठी असल्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यभर अन्न व औषध प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या धडक मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, मात्र प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना त्रास देण्याचा प्रशासनाचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले.
तुकाराम मुंढे म्हणाले की, एफडीएकडून कारवाई सातत्याने सुरू आहे. मात्र कठोर कारवाई म्हणजे व्यावसायिकांवर दबाव आणणे नव्हे, तर सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करणे होय. अन्न आणि औषधांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अधिकारी नियमानुसार आपली जबाबदारी पार पाडत असून, एफडीए ही एक नियामक संस्था म्हणून काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कारवाई करताना लहान किंवा मोठा व्यावसायिक, तसेच कोणताही विशिष्ट भाग असा भेदभाव केला जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांकडून आलेल्या तक्रारी किंवा मिळालेल्या माहितीनंतर त्याची योग्य पडताळणी करूनच पुढील कारवाई केली जाते.
अन्न व औषधांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देताना मुंढे यांनी नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न व औषधे मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
दरम्यान, एफडीएच्या कारवायांमुळे नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळेल आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये अधिक पारदर्शकता निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
