कोरपावली शिवारात वनविभागाची कारवाई; ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त, तस्कर मात्र फरार
साईमत /यावल/ प्रतिनिधी
यावल पश्चिम वनविभागाच्या पथकाने कोरपावली शिवारात कारवाई करत सागवान लाकडाच्या चौपटसह दुचाकी असा सुमारे ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, वनविभागाचे पथक दबा धरून बसलेले असतानाही आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याने या कारवाईबाबत तालुक्यात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आरोपी फरार झाला की त्याला फरार होण्याची संधी देण्यात आली, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
यावल तालुक्यातील पूर्व व पश्चिम वनक्षेत्रात सागवान तसेच अन्य वनसंपत्तीची तस्करी सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. वनविभागाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मुद्देमाल जप्त होतो आणि आरोपी मात्र हाती लागत नाहीत, याबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री यावल पश्चिम वनक्षेत्रातील वनरक्षकांचे पथक हरिपुरा-कोरपावली ते यावल रस्त्याच्या कडेला गस्त घालत असताना एका दुचाकीस्वाराकडे सागवान लाकडाचा चौपट असल्याचे आढळून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला असता संबंधित व्यक्तीने दुचाकी व लाकूड घटनास्थळी टाकून पळ काढल्याचे सांगण्यात आले.
या कारवाईत वनविभागाने एक दुचाकी (किंमत अंदाजे ४० हजार रुपये) तसेच २ हजार रुपये किमतीचे सागवान चौपट (४ नग, ०.०७५ घनमीटर) असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेला मुद्देमाल यावल येथील वनविभागाच्या केंद्रात पावतीद्वारे जमा करण्यात आला असून, हरिपुरा येथील वनरक्षकांनी वनगुन्हा अहवाल क्रमांक ०४-१/०८/२०२६ दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या कारवाईबाबत यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र रविवार सुट्टीचा दिवस असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
यावल पूर्व व पश्चिम वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावांमध्ये सागवान लाकडापासून तयार केलेले दरवाजे, खिडक्या, खुर्च्या, टेबल, दिवान, सोफासेट आदी साहित्य विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा आहे. काही फर्निचर दुकानांमध्ये विक्री होणारे सागवान साहित्य अधिकृत परवानगी घेऊन आणलेल्या लाकडापासून तयार केले आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. जुन्या सागवान लाकडाच्या परवान्यांच्या आधारे नवीन लाकडाचा वापर केला जात असल्याच्या तक्रारींकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
यावल तालुक्यात वनविभागाकडून होणाऱ्या कारवायांची माहिती प्रसिद्ध माध्यमांपर्यंत नियमितपणे पोहोचत नसल्याने कारवाईची वास्तविक स्थिती नागरिकांना समजत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. सातपुडा परिसरातील वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी प्रभावी आणि पारदर्शक कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून केली जात आहे.
वनतस्करी रोखण्यासाठी केवळ मुद्देमाल जप्त करण्याऐवजी तस्करीच्या मुळापर्यंत पोहोचून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे.
