२४ तासांत १०४ मिमी पावसाची नोंद; धरणे, बंधारे तुडुंब भरल्याने शेतीला मोठा आधार
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
दोन दिवस जिल्हाभर धुमाकूळ घालणाऱ्या मुसळधार पावसाने जळगावकरांची अक्षरशः दाणादाण उडवली होती. अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली, रस्ते जलमय झाले आणि दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले. मात्र शुक्रवारी सायंकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने परिस्थितीत सुधारणा होऊ लागली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, शनिवारी (१ ऑगस्ट) जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता असून पुढील काही दिवस अतिवृष्टीचा धोका नसल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा पाऊस गेल्या अनेक वर्षांतील महत्त्वाच्या विक्रमांपैकी एक ठरला आहे. विशेष म्हणजे, ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होणे दुर्मिळ मानले जाते. यापूर्वी १ जुलै २००७ रोजी ९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदाच्या पावसाने तो उच्चांकही मागे टाकला आहे.
हवामान विभागाच्या नोंदीनुसार, २००६ नंतर प्रथमच जिल्ह्यात २४ तासांत १०० मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. ७ ऑगस्ट २००६ रोजी १८६.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतरच्या काळातील अतिवृष्टीच्या घटनांमध्ये यंदाचा पाऊस चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
यंदाच्या पावसाची सर्वाधिक उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात समाधानकारक पर्जन्य झाला. अनेक वर्षांपासून काही भागांत पावसाची कमतरता जाणवत असताना यावेळी संपूर्ण जिल्ह्यावर पावसाने समान कृपादृष्टी दाखवली. त्यामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक बंधारे, लघु सिंचन प्रकल्प आणि नाले ओसंडून वाहू लागल्याने भूजलपातळीतही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिंचनाची उपलब्धता आणि शेतीसाठी आवश्यक जलसाठा या तिन्ही आघाड्यांवर या पावसाचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार १ ऑगस्ट रोजी काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. २ आणि ३ ऑगस्ट रोजी पावसाचा जोर आणखी कमी राहण्याची शक्यता असून ४ ऑगस्ट रोजी केवळ काही मोजक्या ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील चार दिवस जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
