१०८ झाडे संगोपनाचा तरुणांचा संकल्प
साईमत /यावल/प्रतिनिधी
‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संत तुकाराम महाराजांच्या पर्यावरण संवर्धनाच्या विचारांचा जागर करत यावल शहरात आषाढी एकादशी निमित्त अनोख्या पद्धतीने वृक्षदिंडी काढून हरित संदेश देण्यात आला. भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवत शहरातील तरुणांनी १०८ झाडे लावण्याचा व त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर यावल शहरातील बोरावल-शेळगाव रस्त्यावर वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. यावेळी आंबा, चिंच, जांभूळ, नीम, वड, पिंपळ, बेल, गुलमोहर यांसह विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. केवळ वृक्ष लावणे नव्हे, तर त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही तरुणांनी स्वीकारली आहे.
सध्या मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, वाढते तापमान आणि अनियमित पर्जन्यमान यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धनाची गरज ओळखून यावल शहरातील तरुणांनी पुढाकार घेत हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. वृक्षांची सेवा हीच खरी निसर्गपूजा असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
या वृक्षदिंडी व वृक्षारोपण उपक्रमात अध्यात्मिक कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे संचित कोळी महाराज यांच्यासह दुर्गेश कोळी, यश वारके, खुशाल सपकाळे, पंकज चौधरी, लकी चौधरी, कृष्णा पाटील, कृष्णा कोलते, रुपेश कोल्हे, अभिषेक सोनवणे, अभिषेक महाजन, धीरज आणि आयुष आदी तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
याशिवाय ५० ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी आवश्यक सहकार्य रमाबाई बडगुजर आणि कलाबाई चौधरी यांनी केले. त्यांच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला अधिक बळ मिळाले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तीबरोबरच पर्यावरण रक्षणाचा संदेश देत यावलमधील तरुणांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. निसर्गाची काळजी घेणे हे देखील देवाची पूजा आणि नामस्मरण करण्यासारखेच पवित्र कार्य असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
