साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जमिनीच्या क्षुल्लक वादातून सख्या पुतण्याने काकाचा लाकडी काठीने डोक्यात वार करून निघृण खून केला. एवढेच नव्हे तर खुनाला अपघाताचे रूप देण्यासाठी मृतदेह नाल्याकाठी फेकून दिला. मात्र, रावेर पोलिसांनी आपल्या कौशल्याने आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांतच या खुनाचा पर्दाफाश करत आरोपी पुतण्याला बेड्या ठोकल्या आहेत.
रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गारखेडा (ता. रावेर) येथे २१ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पाल पोलीस मदत केंद्राच्या परिसरात रामा थावरू बारेला (वय ४६) यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली असता रामा बारेला यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. त्यावरून रावेर पोलिसांत गुन्हा रजि. क्र. ३५८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक माहिती, भौतिक पुरावे आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे तपास चक्रावले. तपासात निष्पन्न झाले की, मयत रामा बारेला आणि त्यांचा सख्खा पुतण्या अनिल जखा बारेला (वय २९, रा. गारखेडा) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून सतत वाद सुरू होते.
याच वादाच्या रागातून २१ जुलैच्या सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास आरोपी अनिलने घराबाहेर लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या गंभीर मारहाणीत रामा बारेला यांचा जागीच मृत्यू झाला.
अपराध लपवण्यासाठी आरोपी अनिलने काकाचा मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरावर ओढत नेऊन पायवाटे जवळील नाल्याच्या कडेला फेकून दिला, जेणेकरून हा मृत्यू अपघाती वाटेल.
रावेर पोलिसांनी वैज्ञानिक आणि सूक्ष्म पद्धतीने तपास करत अवघ्या काही तासांत आरोपी अनिल जखा बारेला याला २२ जुलै रोजी रात्री अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (फैजपूर विभाग) अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करत आहेत.
