साईमत -नशिराबाद – प्रतिनिधी |
चिकू खाऊ घालण्याचे आमिष दाखवून एका १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेला चिकूच्या मळ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून संशयित आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सुनील सावके (सुपरवायझर, गोदावरी हॉस्पिटल कॅम्पस) याने पीडित १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला चिकू खाऊ घालण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला जवळच असलेल्या चिकूच्या मळ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी पीडितेच्या आईने तात्काळ नशिराबाद पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून संशयित सुनील सावके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४, ६५ सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो – POCSO) कायदा कलम ४, ६, ८ आणि १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वात नशिराबाद पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांना पोलीस कर्मचारी गुणवंत देशमुख, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर भिडे, आरिफ तडवी, रामकृष्ण माळी, प्रवीण लोहार आणि भूषण पाटील हे मदत करत असून पोलिसांकडून आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
