साईमत न्यूज नेटवर्क –
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतात पुढील सहा ते सात दिवस मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रासह देशातील २२ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात मंगळवार आणि बुधवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून गुरुवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठाणे जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर पालघरमध्ये मंगळवारपर्यंत हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात तेथेही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात सर्वाधिक तीव्र पावसाचा अंदाज असून गुरुवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारसह देशातील अनेक राज्यांमध्येही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या काही भागांतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र पश्चिम-मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील आठवड्यात मान्सूनची सक्रियता तुलनेने कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
