साईमत न्यूज नेटवर्क –
रविवारी सकाळी मेटाच्या फेसबुक, फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सेवांमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरातील हजारो वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. विशेषतः फेसबुकच्या डेस्कटॉप आवृत्तीवर लॉग-इन करताना अनेकांना ‘Account Temporarily Unavailable’ असा त्रुटी संदेश दिसू लागला.
या संदेशात, “तांत्रिक अडचणीमुळे तुमचे खाते सध्या उपलब्ध नाही. समस्या लवकरच दूर होण्याची अपेक्षा असून काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा,” असे नमूद करण्यात आले आहे.
वेबसाइट्सच्या सेवांची स्थिती दर्शवणाऱ्या DownDetector नुसार, रविवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास फेसबुक, फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्रामबाबतच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली. ही समस्या जगभरातील अनेक वापरकर्त्यांना जाणवत असली, तरी सर्वच वापरकर्ते या बिघाडामुळे प्रभावित झालेले नाहीत.
इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी फीड लोड न होणे, अॅप वापरताना अडथळे येणे आणि विविध त्रुटी संदेश दिसत असल्याची तक्रार केली. दुसरीकडे, फेसबुक वापरकर्त्यांच्या बहुतांश तक्रारी डेस्कटॉप किंवा वेबसाइट आवृत्तीशी संबंधित होत्या. अनेकांच्या मते, मोबाइल अॅप सुरळीत सुरू असून केवळ लॅपटॉप किंवा संगणकावरील वेबसाइटवर लॉग-इन करता येत नव्हते.
इन्स्टाग्रामवरही “क्षमस्व, काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आहे. ही समस्या शक्य तितक्या लवकर दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” असा संदेश अनेकांना दिसला.
दरम्यान, सोशल मीडियावर आणि रेडिटसारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक वापरकर्त्यांनी आपल्या अडचणी शेअर केल्या. काहींनी मोबाइलवर सेवा सुरळीत सुरू असल्याचे, तर वेबसाइट आणि मेसेंजरच्या कॉलिंग फीचरमध्ये अडथळे येत असल्याचे सांगितले. अॅप पुन्हा इन्स्टॉल करूनही समस्या कायम असल्याची तक्रारही अनेकांनी केली.
या तांत्रिक बिघाडामागील नेमके कारण काय आहे आणि सेवा पूर्णपणे पूर्ववत कधी होणार, याबाबत मेटाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
