साईमत न्यूज नेटवर्क –
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत सफदरजंग रुग्णालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे. गेल्या 21 दिवसांपासून बेमुदत उपोषण करत असलेल्या वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते पूर्णपणे शुद्धीवर आहेत. मात्र, दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली असून काही वैद्यकीय चाचण्यांमध्ये इलेक्ट्रोलाइटची पातळी कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चारू बांबा यांनी सांगितले की, वांगचुक यांचा रक्तदाब, नाडीचा वेग आणि ऑक्सिजनची पातळी सध्या सामान्य आहे. तरीही डिहायड्रेशनमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याने त्यांच्यावर 24 तास वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने उपचार करता यावेत, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, 18 जुलै रोजी वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना शिरेवाटे द्रवपदार्थ तसेच तोंडावाटे रिहायड्रेशन द्रव आणि औषधे घेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, त्यांनी सर्व प्रकारचे द्रवपदार्थ आणि औषधे घेण्यास नकार दिल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यांना उपचारांसाठी समुपदेशन करण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
सोनम वांगचुक हे NEET-UG परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या मागणीसाठी ते 28 जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी (CJP)’च्या बॅनरखाली बेमुदत उपोषण करत होते. प्रकृती खालावल्याने आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर 18 जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवर वांगचुक यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या संमतीशिवाय उपचार सुरू असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंग्मो यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सफदरजंग रुग्णालयाऐवजी त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात वांगचुक यांना हलविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली असून या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
