केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणांनी दणाणले शहर
साईमत /मलकापूर /प्रतिनिधी
लडाखचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या विविध मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी रविवारी मलकापूर शहरात भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. ‘सोनम वांगचूक सपोर्ट समिती’च्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी, वकील, डॉक्टर, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर मोर्चा विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी सहभागी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
‘केंद्र सरकार मुर्दाबाद’, ‘भाजपा मुर्दाबाद’, ‘भारत माता की जय’, ‘संविधान अमर रहे’ तसेच ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. आंदोलकांनी लोकशाही मार्गाने करण्यात आलेल्या मागण्यांची केंद्र सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी केली.
मोर्चाच्या समाप्तीनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली असून, लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच लोकशाही पद्धतीने मांडलेल्या मागण्यांवर केंद्र सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास १५ ऑगस्टपासून देशभर तीव्र आंदोलन आणि उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनामुळे मलकापूर शहरात काही काळ वातावरण आंदोलनमय झाले होते. नागरिकांनीही लडाखच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मोर्चात ॲड. साहेबराव मोरे, डॉ. अरविंद कोलते, समाजभूषण डॉ. जी. ओ. जाधव, ॲड. हरीश रावळ, ॲड. स्नेहल तायडे, गजानन ठोसर, डॉ. अशोक सुरडकर, मंगलाताई पाटील, हाजी रशिदखा जमादार, ॲड. जी. डी. पाटील, संभाजी शिर्के यांच्यासह वकील संघटनेचे पदाधिकारी तसेच पत्रकार हरी गोसावी, हनुमान जगताप, प्रवीण राजपूत, अजय टप, अनिल गोठी, कैलास काळे, करण झनके आदी मान्यवर उपस्थित होते.
