मित्रावर संशय; घटनास्थळावरून चाकू जप्त, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची नाकाबंदी
साईमत /नाशिक /प्रतिनिधी
नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने नाशिकसह जळगाव जिल्हाही हादरला आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी असलेल्या २० वर्षीय तरुणीची भररस्त्यात चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. वैष्णवी अनिल आवारे (वय २०, रा. अमळनेर, जि. जळगाव) असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणात तिच्या परिचयातील एका तरुणावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैष्णवी आवारे ही शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने नाशिकमध्ये पेइंग गेस्ट (पीजी) म्हणून वास्तव्यास होती. शुक्रवारी सायंकाळी तिची संशयित तरुणासोबत भेट झाली होती. दोघांमध्ये काही कारणावरून चर्चा झाल्यानंतर रात्री इंदिरानगरमधील वनसंपदा सोसायटी परिसरातील दत्त मंदिराजवळ हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
चर्चेनंतर संशयिताने अचानक चाकू काढून वैष्णवीवर सपासप वार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अनपेक्षित हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या वैष्णवीने जीव वाचविण्यासाठी मोठ्याने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. मात्र, नागरिक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाला.
दरम्यान, चाकूच्या वारांमुळे गंभीर जखमी झालेली वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. हल्ल्यात वापरण्यात आलेला चाकू मृतदेहाजवळून जप्त करण्यात आला असून घटनास्थळावरील अन्य पुरावेही संकलित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर शहरभर नाकाबंदी करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.
या हत्येमागील नेमके कारण काय, आरोपीचा हेतू काय होता आणि दोघांमधील वादाचे स्वरूप काय होते, याचा सखोल तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत. दरम्यान, अमळनेर येथील तरुणीचा अशा क्रूर पद्धतीने झालेला मृत्यू जळगाव आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांत हळहळ व्यक्त केली जात असून, आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
