”अटक केली तरी आंदोलन थांबणार नाही; संसदेचे अधिवेशन याच विषयाने गाजणार!”
जळगाव/नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर ‘नीट’ (NEET) पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने ताब्यात घेतल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली आणि अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही त्यांना अटक केली तरीही हे आंदोलन चालूच राहणार,” अशा शब्दांत शरद पवारांनी केंद्र सरकारला सुनावले असून, आगामी संसदेच्या अधिवेशनात यावरून मोठा गदारोळ होणार असल्याचा इशारा दिला आहे.
सोनम वांगचुक यांच्यावर झालेल्या पोलीस कारवाईचा तीव्र निषेध करत शरद पवार म्हणाले:
”गेल्या पाच-सहा दिवसांपासून चर्चा होती की त्यांना अटक केली जाईल, आणि नेमकं तसंच झालं. वांगचुक यांची मागणी काय होती? तर ज्या केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडे देशाच्या शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी होती, त्यांनी ती काळजीपूर्वक हाताळली नाही. लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, म्हणून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. एवढे दिवस आंदोलन सुरू असूनही केंद्र सरकार मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत राहिले.”
”आवाक्याबाहेर गेल्यानेच पोलिसांचा बळाचा वापर”
या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून मिळणारा पाठिंबा वाढल्यानेच सरकारने ही कारवाई केल्याचा आरोप पवारांनी केला. “या आंदोलनासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले. काँग्रेसचे प्रतिनिधी गेले, राष्ट्रवादीच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे गेल्या आणि इतर पक्षांच्या नेत्यांनीही तिथे जाऊन सामूहिक मागणी केली. हे आंदोलन आता आपल्या आवाक्याबाहेर जात आहे, हे लक्षात आल्यावरच केंद्र सरकारने वांगचुक यांना पहाटे अटक करण्याचा निर्णय घेतला,” असा टोला पवारांनी लगावला.
वीसविस दिवस देशातील एक ख्यातनाम पर्यावरणशास्त्रज्ञ आणि तरुण दिल्लीत उपोषणाला बसतात, तरी सरकारचा एकही प्रतिनिधी साधे भेटायला जात नाही, याबद्दल शरद पवारांनी तीव्र खंत व्यक्त केली. “त्यांची मागणी अत्यंत रास्त असून ती विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे. सरकारने अटक केली तरी हे आंदोलन संपणार नाही. उलट, आगामी संसदेच्या अधिवेशनाची सुरुवातच या विषयाने होईल,” असा थेट इशारा पवारांनी मोदी सरकारला दिला आहे.
दिल्लीत राजकीय संघर्ष आणखी पेटणार!
सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि इतर आंदोलकांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. त्यातच आता शरद पवारांसारख्या देशातील ज्येष्ठ नेत्याने या आंदोलनाला पूर्ण ताकदीने पाठिंबा दिल्याने, आगामी काळात या मुद्द्यावरून दिल्लीतील राजकीय संघर्ष अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.
