शाश्वत आणि विषमुक्त शेतीसाठी ‘पशुधन’ ठरणार संजीवनी!
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
“पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहे. हवामान बदल आणि शेतीसमोरील वाढती आव्हाने पाहता, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत जळगाव जिल्हा राज्यात नंबर वन ठरवण्यासाठी पात्र पशुपालकांनी मोठ्या प्रमाणावर पुढे यावे,” असे आक्रमक आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) करिश्मा नायर यांनी केले. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आणि जिल्हा प्रशासन खंबीरपणे पाठीशी उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या व्यापक जनजागृतीसाठी पशुसंवर्धन विभाग आणि ‘कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशन’ (CCIF) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात गुरुवारी (१६ जुलै) भव्य मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातील पशुपालक आणि शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती.
शेतीसमोरील संकटांवर ‘पशुधन’ हाच उपाय!
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सीईओ करिश्मा नायर यांनी शेतीपुढील गंभीर आव्हानांवर बोट ठेवले. त्या म्हणाल्या,
”आज शेतीसमोर एल-निनोचा लहरीपणा, मजुरांची तीव्र टंचाई, ओला-सुका दुष्काळ आणि जमिनीची घटती उत्पादकता ही मोठी संकटे आहेत. त्यातच पशुधनाची संख्या घटल्यामुळे नैसर्गिक शेती मागे पडली असून रासायनिक खतांवरची निर्भरता वाढली आहे. अशा कठीण परिस्थितीत मुख्यमंत्री पशुधन योजना ही नैसर्गिक, विषमुक्त आणि शाश्वत शेतीला नवीन बळ देणारी ठरेल.”
सहकारातून क्रांती: क्लस्टर पद्धतीवर भर
मुख्य प्रशिक्षक डॉ. संतोष उमाजी शिंदे यांनी योजनेचे गणित मांडताना सांगितले की, ही योजना जर क्लस्टर (समूह) पद्धतीने आणि सहकाराच्या माध्यमातून राबवली, तर ग्रामीण भागाचे चित्र बदलेल. दूध संघ, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) आणि अटल पणन संस्थांच्या माध्यमातून पशुपालन अधिक सक्षम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी जळगावकरांच्या उत्साहाचे कौतुक करत हा व्यवसाय शाश्वत उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत असल्याचे सांगितले.
’मागेल त्याला पशुधन’ मिळावे!
कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी रवींद्र अमृतकर यांनी शेतकऱ्यांच्या थेट सेवेची संधी दिल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले. तसेच, ही योजना अधिक प्रभावी करण्यासाठी ‘मागेल त्याला पशुधन’ या धर्तीवर लाभ मिळावा आणि समूह पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. केंद्र सरकारने पशुपालनासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काला नवी दिशा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
फाउंडेशनचा विडा : आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, सौरऊर्जेवरील लघु कोल्ड स्टोरेज, सोलर डिहायड्रेशन, आणि ग्रामीण उद्योजकता वाढवून शेतकऱ्यांचा खर्च कमी करणे व उत्पन्न दुप्पट करणे हेच संस्थेचे मुख्य ध्येय असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या महत्त्वपूर्ण कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सूर्यवंशी, कृषिभूषण समाधान पाटील, विकास दूध संघाचे शैलेश मोरखडे, तापी खोरे शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष रामदास कोळी, माजी कृषी संचालक अनिल भोकरे यांच्यासह शेकडो पशुपालक आणि विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत तापी खोरे शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी केले.
