काम आटपून घरी परतताना काळाचा घाला
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी सायंकाळी रेमंड चौफुली जवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. शेखर ईश्वर सपकाळे (वय २५, रा. धामणगाव, ता. जळगाव) आणि पीयुष प्रदीप बेंडाळे (वय २०, रा. अयोध्या नगर, जळगाव) अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शेखर आणि पीयुष हे दोघे एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कामाला आहेत. शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कंपनीतील काम आटपून ते दुचाकीने आपल्या घराकडे निघाले होते. याच दरम्यान, छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे अत्यंत भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने (क्रमांक TN 47 AQ 8403) त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
नागरिकांची तत्परता: धडक इतकी भीषण होती की दोघेही तरुण रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी आणि वाहनधारकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी तातडीने एका खासगी वाहनातून दोन्ही जखमी तरुणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) उपचारासाठी दाखल केले. सध्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महामार्गावरील वेगाला आवर घालणार कोण?
या अपघातामुळे महामार्गावरील अवजड वाहनांच्या अनियंत्रित वेगाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठल्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती. दोन्ही तरुणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
