साईमत -रावेर- प्रतिनिधी |
अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक आणि क्रूर हत्याकांड उघडकीस आले असून, या प्रकरणातील मुख्य आरोपीला जळगाव जिल्ह्याच्या रावेर पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. पैशांच्या वादातून ट्रक चालकाचा गळा दाबून खून केल्यानंतर, पुरावे नष्ट करण्यासाठी चालकाचा मृतदेह ट्रकमध्येच ठेवून ट्रक पेटवून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
केवळ एका अस्पष्ट फोटोच्या आधारे अटक
अमरावतीच्या मोर्शी परिसरात एका उभ्या असलेल्या ट्रकमध्ये चालकाचा जळालेला मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासात हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना होता. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जळगाव जिल्ह्यातील रावेर रेल्वे स्थानक परिसरात लपला असून, तो रेल्वेने पंजाबकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती अमरावती ग्रामीण पोलिसांनी जळगाव पोलिसांना दिली.
माहिती मिळताच रावेर पोलिसांची पथके तात्काळ सतर्क झाली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रावेर रेल्वे स्थानक आणि परिसरात शोधमोहीम सुरू केली. आरोपीचा कोणताही स्पष्ट मागमुस नसताना, पोलिसांनी केवळ एका अस्पष्ट फोटोच्या आधारे शोध घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव मनप्रीतसिंह कश्मीरसिंह रंधावा (वय ४८, रा. अमृतसर, पंजाब) असे आहे. रावेर पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली असता, त्याने पैशांच्या वादातून ट्रक चालकाचा आधी गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर हा प्रकार अपघाती वाटावा आणि गुन्ह्याचे पुरावे नष्ट व्हावेत, यासाठी मृतदेहासह संपूर्ण ट्रकला आग लावल्याचे त्याने मान्य केले.
रावेर पोलिसांनी कारवाई करत आरोपीकडून PB-02-EW-4299 क्रमांकाची आयशर ट्रक जप्त केली आहे. या यशस्वी कारवाईनंतर अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक आरोपीचा ताबा घेण्यासाठी आणि पुढील कायदेशीर तपासासाठी रावेरकडे रवाना झाले आहे. एका अस्पष्ट फोटोच्या साहाय्याने अत्यंत संवेदनशील गुन्ह्यातील आरोपीला काही तासांत जेरबंद केल्यामुळे रावेर पोलिसांचे कौतुक होत आहे.
