साईमत -नशिराबाद – प्रतिनिधी |
नशिराबाद नगर परिषद हद्दीतील भवानी नगर परिसरातील अत्यंत गरीब व गरजू नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी विशेष सर्वेक्षण करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप साळी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद नशिराबाद यांना एक सविस्तर निवेदन दिले आहे.
पाच वर्षांपासून एकही लाभ नाही; नागरिकांचे हाल
निवेदनात नमूद केल्यानुसार, भवानी नगर परिसरात अनेक गरीब कुटुंबे झोपडपट्टीसदृश व जीर्ण घरांमध्ये अत्यंत हालाखीचे जीवन जगत आहेत. पावसाळ्यात या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी गळते, ज्यामुळे अनेक कुटुंबांकडे सुरक्षित निवाऱ्याचा अभाव निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या पाच वर्षांपासून या परिसरातील एकाही पात्र गरीब कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
या परिसरातील बहुतांश नागरिकांकडे ७/१२ उतारा किंवा सिटी सर्व्हे उतारा उपलब्ध नाही. त्यांच्याकडे केवळ नमुना ८-अ असल्यामुळे शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळण्यात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन:
भवानी नगरात विशेष सर्वेक्षण करून पात्र व गरजू कुटुंबांची नवीन यादी तयार करावी.
मागील पाच वर्षांतील लाभ वितरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.
नमुना ८-अ धारक नागरिकांनाही शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा.
प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, विभागीय आयुक्त नाशिक, प्रधान सचिव (गृहनिर्माण विभाग) तसेच मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई यांनाही माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या निवेदनावर पुढील १५ दिवसांच्या आत ठोस कार्यवाही न झाल्यास भवानी नगरातील नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जनरल कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप साळी यांनी दिला आहे.
