तालुक्यातील कुऱ्हा गावाजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात वरणगाव येथील २८ वर्षीय रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे वरणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, दि. १४ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कुऱ्हा गावाजवळील पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. खेडी बुद्रुक (ता. जळगाव) येथील मनिष आदिनाथ संघवे (वय ४३) हा महिंद्रा कंपनीची कार (एमएच १९ सीव्ही ७०८१) भरधाव वेगाने चालवत होता. यावेळी समोरून येणाऱ्या रिक्षाला (एमएच २० ईके ३४४०) त्याच्या कारने जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत वरणगाव येथील सिद्धेश्वर नगरातील रहिवासी रिक्षाचालक हर्षल प्रकाश गायकवाड (वय २८) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर उपस्थितांनी तातडीने मदत करून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. अपघातामुळे रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कारचेही नुकसान झाले आहे. काही काळ या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या प्रकरणी मृताचे वडील प्रकाश जुलाल गायकवाड (वय ५७, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक मनिष संघवे याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या अपघातामुळे वरणगाव शहरात शोककळा पसरली आहे. हर्षल गायकवाड यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये दुःखाचे वातावरण आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार धीरज मंडलीक करीत असून, पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची प्रक्रिया सुरू आहे.
