२८ वर्षीय तरुणाची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट, परिसरात हळहळ
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील राममंदिर परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने बुधवारी सकाळी राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुण काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची चर्चा असली तरी पोलिसांकडून त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.निवृत्ती गोकुळ बोबडे (वय २८, रा. राममंदिर परिसर, शिरसोली प्र.न., ता. जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कुटुंबीयांच्या निदर्शनास प्रकार आल्यानंतर तातडीने स्थानिक प्रशासनाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.
यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याला घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
निवृत्ती बोबडे यांच्या पश्चात आई, वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. तरुणाच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शिरसोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत असून, आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
