साईमत न्यूज नेटवर्क –
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर आता नवी मुंबईतील ऐरोली परिसरातून आणखी एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. अनैतिक संबंधांना अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप असून, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तीन तुकडे करून जंगलात फेकल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी पत्नी सुनिता कुशवाह (४०) आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती (३०, रा. घणसोली) यांना अटक केली आहे. बलीराम सूर्यनाथ कुशवाह (५०) असे मृत पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलीराम कुशवाह हे ऐरोलीतील यादवनगर परिसरात पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. दरम्यान, पत्नी सुनिता हिचे घणसोलीतील रिक्षाचालक राहुल प्रजापती याच्याशी प्रेमसंबंध जुळले. या संबंधांची माहिती बलीराम यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याला विरोध केला. त्यानंतर घरात वारंवार वाद होत असल्याने सुनिता आणि राहुल यांनी बलीराम यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
योजनेनुसार, सुनिताने आधी दोन्ही मुलांना दोन दिवसांसाठी नातेवाईकांकडे पाठवले. त्यानंतर ९ ऑगस्ट २०२५ च्या रात्री बलीराम झोपेत असताना दोघांनी मिळून त्यांचा गळा आवळला. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे.
हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी घरातच मृतदेहाचे तीन तुकडे केले. मुंडके, धड आणि पाय वेगवेगळ्या गोण्या व चादरीत गुंडाळून राहुलच्या रिक्षातून गवळी देव डोंगर परिसरातील दाट झाडीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याचे तपासात उघड झाले आहे.
हत्येनंतर सुनिताने ऐरोलीतील घर भाड्याने दिले आणि मुलांसह घणसोली येथे राहुलसोबत राहू लागली. काही महिन्यांनंतर बलीराम यांचा भाऊ गावाहून आल्यानंतर भावाबाबत विचारणा केली असता, “भांडण करून घर सोडून गेले,” असे सुनिताने सांगितले. मात्र संशय आल्याने एप्रिल २०२६ मध्ये रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपींनी मोबाईल आणि सिमकार्ड बदलल्याचे समोर आले. मात्र, कॉल डिटेल रेकॉर्डच्या आधारे राहुल आणि सुनिता यांच्यातील सातत्यपूर्ण संपर्क पोलिसांच्या निदर्शनास आला. तसेच, चौकशीदरम्यान सुनिताने पतीबाबत विसंगत माहिती दिल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. अखेर दोघांना ताब्यात घेऊन स्वतंत्र चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी गवळी देव डोंगर परिसरात मृतदेहाच्या अवशेषांचा शोध सुरू केला आहे. मात्र, घटनेला सुमारे ११ महिने उलटल्याने पुरावे आणि मानवी अवशेष शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. तपास अद्याप सुरू असून, या प्रकरणातील पुढील तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
