साईमत न्यूज नेटवर्क –
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दीपके गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि शिक्षणमंत्र्यांविरोधात सातत्याने आवाज उठवत असून, देशातील विविध शहरांतही त्यांनी आंदोलन छेडले आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “मी आज एका महत्त्वाच्या विषयासाठी आलो आहे. जंतरमंतरवर अभिजीत दीपके यांनी उचललेला मुद्दा हा लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित आहे. नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. मात्र सरकारला याची चिंता नसून त्यांचे लक्ष इतर राजकीय घडामोडींमध्ये आहे,” असा आरोप त्यांनी केला.
यावेळी ठाकरे यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आंदोलनालाही पाठिंबा जाहीर केला. “विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. सोनम वांगचूक आणि अभिजीत दीपके यांच्या आंदोलनामागील भावना योग्य आहेत. त्यामुळे त्यांच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करताना ठाकरे म्हणाले की, “ते गेल्या १६ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. काही दिवसांपूर्वी खासदार अरविंद सावंत यांनी त्यांची भेट घेतली होती. मीही त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. देशाला त्यांच्या विचारांची आणि कार्याची गरज आहे. मात्र सरकारला त्याची जाणीव नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे.”
देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मतही ठाकरे यांनी व्यक्त केले. “प्रत्येक मुद्द्यावर राजकारण करण्याची गरज नाही. मात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असेल, तर सर्व पक्षांनी पक्षीय भेद बाजूला ठेवून एकत्र यायला हवे. पक्षाचे झेंडे घेऊन आंदोलनात सहभागी व्हावे, असे मी म्हणत नाही. पण अभिजीत दीपके देशातील युवकांचा आवाज बनले आहेत आणि त्या आवाजाला सर्वांनी साथ दिली पाहिजे,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
