जळगावात यलो अलर्ट कायम अधूनमधून रिमझिम पावसाची हजेरी
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनने जोरदार मुसंडी मारली असून पुढील काही दिवस पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यांत अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईसह कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पुढील ७२ तास पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अवघ्या २४ तासांत सुमारे २०० मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि दैनंदिन जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रायगड आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत अतिशय जोरदार पावसाचा धोका लक्षात घेता प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातही पावसाचा जोर कायम राहणार असून बुलडाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील अनेक इतर जिल्ह्यांमध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज यलो अलर्ट कायम असून गेल्या दोन दिवसांपासून सतत अलर्ट देण्यात येत असतानाही अद्याप अपेक्षित मुसळधार पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून सकाळपासून काही भागांत रिमझिम पावसाची नोंद झाली आहे. मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जळगावमध्ये दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. तर किमान तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष हवामानाच्या पुढील घडामोडींवर केंद्रित झाले आहे.
