साईमत न्यूज नेटवर्क –
छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेतून दाखला (टीसी) घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने वर्गशिक्षकावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे शाळा परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित विद्यार्थ्याचा काही दिवसांपूर्वी शाळेत वर्गशिक्षकाशी वाद झाला होता. त्यानंतर विद्यार्थ्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी तो शाळेत टीसी (दाखला) घेण्यासाठी आला असता, पुन्हा त्याचा आणि संबंधित शिक्षकाचा वाद झाला.
वादाचे रूपांतर काही क्षणांतच हिंसाचारात झाले. विद्यार्थ्याने जवळ बाळगलेला चाकू काढून शिक्षकांवर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी तत्काळ हस्तक्षेप करून जखमी शिक्षकांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली असून, हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकू विद्यार्थ्याने एका ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळावरून मागवल्याचे निष्पन्न झाले आहे.
या माहितीमुळे हा हल्ला पूर्वनियोजित असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. विद्यार्थ्याने चाकू कधी आणि कोणत्या उद्देशाने मागवला, तसेच हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेनंतर शाळांमधील विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून वाढत्या हिंसक प्रवृत्तीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये मानसिक आरोग्य, समुपदेशन आणि सुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
