जळगाव/मुंबई:
“आम्ही मशाल समोर बटन दाबा म्हणतात, पवार साहेब तुतारीचं बटन दाबा म्हणतात. पण भाजपवाले म्हणतात कोणाचंही बटण दाबा, माणूस आमच्याकडेच येणार! जर अशी परिस्थिती असेल, तर आता देशाला आणि आपल्या सगळ्यांना मिळून ‘ऑपरेशन कमळ’ राबवावं लागेल,” अशा कडक शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना त्यांनी भाजपसह पक्ष सोडून गेलेल्या गद्दार खासदारांवर आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणाऱ्यांवर कडाडून टीका केली.
‘मातोश्री’वर चिखलफेक करणाऱ्यांना सडेतोड उत्तर
ठाकरे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे भावुक आणि तितकेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. “माझ्यावर, माझ्या पत्नीवर, आदित्य आणि तेजसवर आरोप केले जात आहेत, बदनामी केली जात आहे. आम्ही सोसायचं किती?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, “मातोश्रीवर चिखलफेक करणारी ही औलाद कोणाची?” असा संतप्त सवाल करत, “शिवसेना स्थापनेचा नारळ माझ्यासमोर फुटला होता. त्या पाण्याचे तुषार माझ्या अंगावर उडाले होते, मी सर्वात ज्येष्ठ शिवसैनिक आहे,” अशी आठवण त्यांनी करून दिली. जुन्या रूढी आणि प्रवृत्ती मोडून काढण्यासाठीच प्रबोधनकार ठाकरे उभे राहिल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
मतदारांची माफी आणि गद्दारांवर निशाणा
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, “मोदी लाट असताना तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि ९ खासदार मोठ्या डौलाने निवडून आले. पण आज जी गद्दारी झाली, त्यावर मी मतदारांची माफी मागतो. इतके सत्तापिपासू कसा काय होऊ शकता? मरमर आपण करायची, माणसं निवडून आपण आणायची आणि नंतर हे खोके घेऊन जाणार! याच्यापुढे शिवसेना निवडणूक लढवणार नाही, माझ्यासोबत किती जण राहतील?” असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. तसेच, कष्ट करून खासदारांना निवडून देणाऱ्या जनतेला आता त्यांना जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे, असेही ते म्हणाले.
‘लाडकी बहीण’ योजनेवरून सरकारवर टीका
राज्यातील महायुती सरकारच्या योजनांवर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले की, “निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना आणली गेली आणि नंतर ८० लाख बहिणींना या योजनेतून बाहेर काढण्यात आलं आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.
आमचं हिंदुत्व शेंडी-जाणव्याचं नाही!
भाजपच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेवर प्रहार करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही पाकिस्तानातून आलेलो नाही, आम्ही देशप्रेमी आहोत. माझ्या आजोबांना (प्रबोधनकार ठाकरे) विरोध करणारे गोमूत्रधारी होते. आमचं हिंदुत्व हे शेंडी-जाणव्याचं नाही, तर ‘राष्ट्रीयत्व’ हेच आमचं हिंदुत्व आहे. भेसळयुक्त रक्त कधीही हातात भगवा घेऊ शकत नाही.”
वन नेशन, नो इलेक्शन’कडे वाटचाल
देशातील लोकशाही धोक्यात आल्याचा इशारा देत त्यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. “नड्डा बोलले होते ‘वन नेशन, वन इलेक्शन’. पण आता यांची वाटचाल ‘वन नेशन, नो इलेक्शन’च्या दिशेनं सुरू आहे. तरुणांना झुरळ समजणाऱ्या या प्रवृत्तीमुळे देशाचं भवितव्य काय? जर तुम्ही या वाटेनं जात असाल, तर तुम्हाला दीर्घकाळ सत्ता मिळणार नाही,” असा सज्जड दमही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला.
