साईमत -पाचोरा प्रतिनिधी |
शहरातील लक्ष्मीआंगन कॉलनी परिसरात ऑनलाईन पार्सल देण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेसह तिच्या लहान मुलांना बनावट पिस्तुलाचा (Air Gun) धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना पाचोरा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि पाचोरा पथकाने ही कामगिरी केली असून, आरोपींकडून चोरीला गेलेली रोकड आणि गुन्ह्यात वापरलेले बनावट पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
गत १२ जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कुसुम एकनाथ मोकळे (रा. लक्ष्मीआंगन कॉलनी, पाचोरा) या आपल्या मुलांसह घरात असताना ही घटना घडली होती. चेतन उर्फ जितू भुतेकर व त्याच्या दोन साथीदारांनी “तुमचे अमेझॉनचे पार्सल आले आहे,” असे सांगत घरात प्रवेश केला.
घरात शिरताच चोरट्यांनी आपला खरा चेहरा दाखवला. एका आरोपीने थेट पिस्तूल काढून कुसुम मोकळे आणि त्यांच्या मुलांवर रोखले व त्यांना एका कोपऱ्यात शांत बसण्यास बजावले. चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत संपूर्ण कपाटाची उचकापाचक केली. अखेर कपाटात सापडलेले ७ हजार रुपये आणि मुलाच्या पिगी बँकेतील (गल्ला) ७०० रुपये, असा एकूण ७ हजार ७०० रुपयांचा ऐवज घेऊन आरोपींनी तिथून पळ काढला होता. या प्रकरणी पाचोरा पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे पाचोरा शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलीस यंत्रणेने तात्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयावरून आधी चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर (रा. सातगाव-डोंगरी, ता. पाचोरा) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, या गुन्ह्याचा मास्टरमाईंड त्याचा मामा गोकुळ महादू वाघ (पाटील) आणि नाशिकचा योगेश परशराम शिंदे (रा. सातपूर, नाशिक) हे असल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ पथक रवाना करून आरोपी योगेश शिंदे याला नाशिकमधून अटक केली आणि त्याच्याकडून चोरीची संपूर्ण रक्कम व ते बनावट पिस्तूल जप्त केले.
ही धडक कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ आणि त्यांच्या पथकाने केली आहे. अटकेतील आरोपींची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू असून, त्यांनी जिल्ह्यात असे आणखी काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.
