कारवरील नियंत्रण सुटले आणि अनर्थ घडला कारची दुचाकी व पादचाऱ्यांना धडक सावद्यात भीषण अपघातात एकाचा मृत्यू
साईमत/सावदा/ प्रतिनिधी :
सावदा शहरात सोनाली कोल्ड्रिग्ज परिसरात रविवारी (दि. १४ जून) सायंकाळी सुमारे ५ वाजता घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. भरधाव वेगात आलेल्या कारने आधी दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पादचाऱ्यांना चिरडल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव (ता. रावेर) येथील सरफराज समशेर तडवी हा हुंडाई आय-२० (क्र. एमएच ०१ एआर २७०६) कारने वाघोदा बु.कडून सावद्याच्या दिशेने अतिवेगाने व निष्काळजीपणे येत होता. सावदा–वाघोदा मार्गावर त्याने विनानंबर स्प्लेंडर प्लस दुचाकीवरील शेख जकरीया शेख जहीर, शेख रिजवान, शेख रियाज व मुदस्सर शेख जमीर (रा. चिनावल, ता. रावेर) यांना जोरदार धडक दिली.
धडकेनंतर कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोरगाव बु. येथील आत्माराम बाबुराव ढिवरे, त्यांची पत्नी मंदाबाई ढिवरे व मुलगा मनोहर ढिवरे यांच्यावर आदळले. या दुर्घटनेत आत्माराम बाबुराव ढिवरे (वय ५३) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर मनोहर ढिवरे, मंदाबाई ढिवरे तसेच दुचाकीवरील सर्व जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच सावदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी मनोहर आत्माराम ढिवरे (वय २५, रा. मोरगाव बु., ता. रावेर) यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरफराज समशेर तडवी या चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या भीषण अपघातामुळे सावदा परिसरात शोककळा पसरली असून, भरधाव व निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहनही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
