साईमत न्यूज नेटवर्क –
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर परिसरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारा टेम्पो विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक सिद्धनाथांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतीच्या प्रवासात असताना म्हसवड–पंढरपूर मार्गावरील तांदळवाडी गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट विहिरीत कोसळला. अपघात इतका भीषण होता की अनेक प्रवासी जागीच मृत्युमुखी पडले.
या दुर्घटनेतील मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून रांजणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य सुरू असून जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. या दुर्घटनेमुळे पंढरपूर आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
