साईमत न्यूज नेटवर्क –
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात कार्यरत असलेल्या एका प्राथमिक शिक्षकाने पत्नी आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी घडली असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षक तळोदा तालुक्यात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शाळांना सुट्टी असल्याने ते पत्नी आणि दोन मुलांसह मूळ गावी आले होते. याच दरम्यान कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक संशयानुसार आईस्क्रीममधून विष दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर पत्नी आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर शिक्षकानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
प्राथमिक तपासात संबंधित शिक्षकाला शेअर मार्केटमध्ये सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक आर्थिक तोटा झाल्याची माहिती समोर येत आहे. या आर्थिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमके कारण काय होते, विषप्रयोग कसा करण्यात आला आणि आर्थिक नुकसानीचा या घटनेशी किती संबंध आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
