वेरूळ:
मुलीसाठी आईस्क्रीम आणि स्वतःसाठी सर्दी-खोकल्याचे औषध आणण्यासाठी घराबाहेर पडलेले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुरेश रुपचंद बोरसे हे पुन्हा जिवंत घरी परतलेच नाहीत. बुधवारी रात्री घडलेल्या या अत्यंत क्रूर आणि धक्कादायक घटनेमुळे वेरूळ परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. “मला वाचवा…” हेच पतीचे शेवटचे शब्द ठरल्याची विदारक व्यथा त्यांच्या पत्नीने मांडली असून, या घटनेमुळे बोरसे यांचे हसते-खेळते कुटुंब एका रात्रीत उध्वस्त झाले आहे. या प्रकरणावरून हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनीही सोशल मीडियावर संतापजनक पोस्ट शेअर करत न्याय मागितला आहे.
‘आम्ही पोलीस आहोत!’… आणि काळ आला
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वीच घरी आलेल्या पाहुण्या लहान मुलांसाठी आइस्क्रीम आणि स्वतःसाठी औषध आणायला सुरेश बोरसे बाजारात गेले होते. मात्र, काही वेळातच त्यांच्या भाच्याचा फोन आला, “आत्या, लवकर या, मामांना कोणीतरी मारतय आणि गाडीत घेऊन जात आहे!” या एका फोनने संपूर्ण घराचा थरकाप उडाला.
मयत शिक्षकाच्या पत्नी अनिता बोरसे आणि मुलींनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. तिथे एका काळ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीत दोन लोकांनी सुरेश बोरसे यांना पकडून ठेवले होते. पत्नीला पाहताच, ‘मला वाचवा…’ असा सुरेश बोरसे यांनी जिवाच्या आकांताने हंबरडा फोडला. मुलीने गाडी आडवून वडिलांना सोडण्याची विनंती केली. पण, ‘आम्ही पोलिस आहोत,’ अशी धमकी देत पांढरा सदरा आणि जीन्स घातलेल्या एका व्यक्तीने त्यांना बाजूला ढकलले. ‘सरकारी कामात अडथळा आणल्याचा’ गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत ७ ते ८ निष्ठुर लोकांनी बोरसे यांना गाडीबाहेर फेकले. पतीचा श्वास कोंडत होता, त्या हतबल अवस्थेतही मायलेकींनी त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
कुटुंब उघड्यावर; पोलिसांवर केस दडपण्याचा आरोप
घरातील एकमेव कमावता पुरुष गेल्याने बोरसे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले आहे. मृत शिक्षकाची पत्नी अनिता बोरसे यांनी पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, “माझे पती अत्यंत निरपराध होते, त्यांची कोणतीही चूक नसताना त्यांचा जीव घेतला गेला. आता पोलीस या प्रकरणावर पडदा टाकण्याचा आणि केस दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.” या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी कुटुंबाने केली आहे.
शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांची कारवाई
गुरुवारी (ता. ११) दुपारनंतर घाटी रुग्णालयात बोरसे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, बोरसे यांना ‘कोरोनरी आर्टरी डिसीज’ (हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज) होता, असा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी विसेरा (Viscera) राखून ठेवण्यात आला असून फॉरेन्सिक अहवालानंतरच अंतिम कारण समोर येईल.
सध्याची स्थिती: या धक्कादायक मृत्यू प्रकरणात एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी जवळपास पाच जणांची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती. जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असणाऱ्यांवरच आता संशयाची सुई असल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
