साईमत न्यूज नेटवर्क –
बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणारी कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना साहेबपूर कमल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बख्दा परिसरात राष्ट्रीय महामार्ग-३१ जवळ घडली. मृतांमध्ये रतवारा पोलीस ठाण्याचे प्रभारी साजन पासवान, बेल्लारी पोलीस ठाण्याचे प्रभारी नीरज कुमार, अरार पोलीस ठाण्याचे प्रभारी ज्ञानेंद्र अमरेंद्र तसेच खासगी वाहन चालक ज्योतीश कुमार यांचा समावेश आहे.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व पोलीस अधिकारी गुरुवारी रात्री उशिरा पाटण्यात एक दिवसीय प्रशिक्षण पूर्ण करून मधेपुरा जिल्ह्याकडे परतत होते. याच दरम्यान भरधाव वेगातील कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार मागून ट्रकला जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी साजन पासवान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बेगुसरायचे एसपी मनीष कुमार, सदरचे डीएसपी आनंद पांडे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, बेगुसरायचे डीआयजी शैलेश कुमार आणि मधेपुरा जिल्ह्याचे एसपी यांनीही रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
