साईमत -जळगाव- प्रतिनिधी |राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अद्याप संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या प्रभावाखाली आलेला नाही. त्यामुळे सध्या राज्यात दुहेरी हवामान पाहायला मिळत आहे. एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर दुसरीकडे अनेक भागांमध्ये उष्णता आणि दमट वातावरणाचा त्रास कायम आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील २८ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जारी केला असून विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा दिला आहे.
या २८ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगावात अशी राहणार स्थिती: उकाड्याने जीव नकोसा!
एकतीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असला, तरी जळगाव जिल्ह्यात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जळगावात सध्या तापमानासह हवेतील आर्द्रतेत (दमटपणा) कमालीची वाढ झाली आहे. यामुळे जळगावकरांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असून अंगाची लाहीलाही होत आहे.
पारा ४३ अंशांवर जाण्याची शक्यता: पुढील ३ ते ४ दिवसांत जळगाव जिल्ह्याचा पारा ४२ ते ४३ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त: मे महिन्याच्या तुलनेत तापमान थोडे कमी वाटत असले, तरी वातावरणातील आर्द्रता अत्यंत जास्त राहणार आहे. तापमान आणि आर्द्रता या दोन्हीच्या युतीमुळे जळगावकरांना केवळ उष्णतेचे चटकेच बसणार नाहीत, तर अंगातून घामाच्या धारा वाहून जीव नकोसा होणार आहे.
एकंदरीत, राज्याच्या इतर भागांत वरुणराजाची कृपा होत असताना, जळगावकरांना मात्र मान्सूनच्या दमदार हजेरीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र आहे.
