सामान्य नागरिक आणि तरुणांमध्ये राजकारणाविषयी वाढत चाललेला अविश्वास लक्षात घेता व्यंगातून जन्माला आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या ऑनलाईन चळवळीने देशभरात लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर सुरुवातीला विडंबन म्हणून सुरू झालेल्या या उपक्रमाला कोट्यवधी लोकांनी पाठिंबा दिल्यानंतर ही चळवळ आता केवळ डिजिटलपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष रस्त्यावरही उतरली आहे. ६ जून रोजी संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनातून या चळवळीने आपली ऑफलाईन उपस्थितीही दाखवून दिली.
या वाढत्या लोकप्रियतेची दखल आता राजकीय वर्तुळातही घेतली जात असून इंडिया आघाडीच्या सोमवारी (८ जून) दिल्लीत झालेल्या बैठकीत ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा उल्लेख अनेक नेत्यांनी केला. काही नेत्यांनी या चळवळीशी संवाद साधण्याची गरज व्यक्त केली, तर काहींनी लोकांच्या वाढत्या असंतोषाचे हे प्रतीक असल्याचे मत मांडले.
या चर्चेदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या नव्या डिजिटल चळवळीवर भाष्य करत विरोधकांनी वर्षभर सक्रिय राहण्याची गरज असल्याचे सांगितले. कॉक्रोच जनता पार्टीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा राजकीय पक्षांसाठी विचार करण्यासारखा मुद्दा असल्याचे त्यांनी नमूद केले.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही या चळवळीचा उल्लेख करत तिच्या कार्यपद्धतीकडे लक्ष देण्याची सूचना केली. तर सीपीआय-एमएल (लिबरेशन)चे सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्याची भूमिका मांडली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीही या चळवळीवर भाष्य करत हे तरुणाईच्या मनातील निराशा आणि असंतोषाचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले. तसेच, या चळवळीने राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सुचवले.
दरम्यान, देशातील विविध राज्यांतील अलीकडील निवडणुकांनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, काही पक्षांच्या भूमिका बदलल्याचेही दिसून येत आहे.
