ना जास्त गरम, ना पूर्ण चार्जिंग; तरीही २ वर्षे जुन्या ‘व्हिवो’ (Vivo) स्मार्टफोनचा अचानक स्फोट
जोधपूर येथील मंडोर कृषी मंडी परिसरात एका किराणा व्यापाऱ्याच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल अचानक बॉम्बसारखा फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण स्फोटानंतर मोबाईलला लागलेल्या आगीत व्यापाऱ्याच्या गुडघ्याच्या वरचा (मांडीचा) भाग आणि हाताची बोटे गंभीररीत्या भाजली असून त्वचेचे पापुद्रे निघाले आहेत. या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोपाल सोनी (वय ३९, रा. लाल सागर परिसर) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या किराणा व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
…अन् जणू विजेचा तीव्र धक्काच बसला!
जखमी व्यापारी गोपाल सोनी यांनी रुग्णालयातून ‘दिव्य मराठी’शी बोलताना आपला थरारक अनुभव सांगितला. ते म्हणाले, “सोमवारी दुपारी ३:३० वाजता मी मंडीतील माझ्या किराणा दुकानात काउंटरपाशी बसलो होतो. मी नेहमी माझा मोबाईल शर्टच्या वरच्या खिशात ठेवतो, पण सोमवारी टी-शर्ट घातली असल्याने फोन पॅन्टच्या खिशात होता. मी काउंटरच्या ड्रॉवरमध्ये काहीतरी तपासत असतानाच अचानक खिशात मोठा स्फोट झाला. एका क्षणासाठी मला वाटले की जवळ असलेल्या लॅपटॉपमुळे मला विजेचा तीव्र धक्का बसला आहे.”
स्फोट होताच गोपाल यांच्या खिशातून प्रचंड धूर आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. तीव्र वेदनेमुळे ओरडत ते टेबलापासून दूर पळाले आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी जळणारा फोन खिशातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांच्या हाताची बोटेही गंभीररीत्या भाजली. आरडाओरड ऐकून कृषी बाजारातील इतर व्यापारी आणि शेजारी तातडीने दुकानाच्या दिशेने धावले. त्यांनी तात्काळ गोपाल यांना सावरत खुर्चीवर बसवले आणि गंभीर भाजलेल्या अवस्थेत मंडोर येथील सॅटेलाईट हॉस्पिटलमध्ये पोहोचवले.गोपाल सोनी यांची प्रकृती गंभीर असल्याने मंगळवारी सकाळी ११:३० वाजता त्यांचे मित्र नीरज बन्सल यांनी त्यांना तातडीने महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये हलवले. सध्या तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची जखम अतिशय खोल असून हॉस्पिटलचे प्लास्टिक सर्जन डॉ. राजेश गालवा यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
फोन १००% चार्जही नव्हता; मग स्फोट का झाला?
या घटनेमुळे स्मार्टफोन वापरकर्त्यांची चिंता कमालीची वाढली आहे. गोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २ वर्षांपूर्वी ‘व्हिवो’ (Vivo) कंपनीचा मोबाईल खरेदी केला होता. साधारणपणे मोबाईल १००% पेक्षा जास्त चार्ज झाल्याने किंवा रात्रभर चार्जिंगवर ठेवल्याने फुटतात असा समज आहे; मात्र अपघाताच्या वेळी हा मोबाईल फक्त ८७% चार्ज होता. स्फोट होण्यापूर्वी फोन अजिबात गरम झाला नव्हता किंवा त्यात कोणत्याही बिघाडाचे संकेत मिळत नव्हते. अगदी सामान्य स्थितीत असताना झालेल्या या स्फोटामुळे मोबाईल कंपन्यांच्या सुरक्षेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
