नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमणाचा आरोप, प्रशासनाकडे चौकशीची मागणी
साईमत/सावदा (ता. रावेर)/ प्रतिनिधी
सावदा–फैजपूर राज्य मार्गावर पूर्वापार अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक नाल्याचे अतिक्रमण करून त्याचे गटारीत रूपांतर करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकरणात भू-माफियांचा हात असल्याचा आरोप होत असून, प्रशासनाकडे तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सावदा नगरपालिका हद्दीतील हॉटेल मनालीलगत असलेला हा नैसर्गिक जलप्रवाह महसूल विभागाच्या अधिकृत नोंदीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सातपुडा पर्वतरांगांमधून सुमारे ११ किलोमीटर अंतरावरून वाहत येणारा हा प्रमुख नाला असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून नेण्याची त्याची नैसर्गिक क्षमता आहे.
मात्र, काही भू-माफियांनी संगनमत करून या नाल्याचे मूळ स्वरूप बदलत त्याला कागदोपत्री “नाली” असे दर्शवून गट नं. १३५ मध्ये ले-आऊट मंजुरी मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्षात २७ ते २८ फूट रुंदीचा असलेला हा नैसर्गिक नाला पूर्णतः नामशेष करून त्या ठिकाणी केवळ २ ते ३ फूट रुंदीचे सिमेंट गटर बांधण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या कामासाठी २०१६ सालची जुनी मोजणी शीट वापरून प्रशासनाची दिशाभूल करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. परिणामी, नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर मोठा परिणाम झाला असून पावसाळ्यात पाणी साचून ते आसपासच्या वसाहतींमध्ये तसेच राज्य महामार्गावर शिरते. त्यामुळे नागरिक, वाहनचालक आणि शालेय विद्यार्थ्यांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यापूर्वी प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून परिसरात पाणी तुंबत असल्याचे मान्य केले असले, तरी अद्याप ठोस कारवाई न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नैसर्गिक जलप्रवाह अडवणे हा गंभीर गुन्हा असून भारतीय न्याय संहिता अंतर्गत संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी पालिका विरोधी गटनेते राजेश वानखेडे यांनी केली आहे. तसेच गट नं. १३५ मधील ले-आऊट मंजुरी तत्काळ रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
या प्रकरणाच्या प्रती जिल्हाधिकारी, नगररचना विभाग (जळगाव) Jalgaon, रावेर तहसीलदार आणि नगरपरिषद प्रशासनाला पाठवण्यात आल्या असून, आता प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे सावदा–फैजपूर मार्गावरील Faizpur परिसरातही पावसाळी पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. Raver तालुक्यातील नागरिकांनीही या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
