महायुतीला मोठा दिलासा; ६ जागा बिनविरोध, ११ मतदारसंघांत सामना रंगणार
साईमत/मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. महायुती आणि महाविकास आघाडीतील संघर्ष, तसेच अंतर्गत बंडखोरी आणि समेटाच्या राजकारणामुळे अनेक मतदारसंघांचे चित्र बदलले.
अर्ज माघारीनंतर राज्यातील ठाणे, कोकण (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), यवतमाळ, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर, पुणे आणि अहिल्यानगर या सहा मतदारसंघांत उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ११ मतदारसंघांत मात्र थेट आणि तिरंगी लढती रंगणार असल्याने निवडणुकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
रायगडमध्ये मोठा राजकीय उलटफेर
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी माघार घेतल्यानंतर महायुतीचे अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला. या निर्णयानंतर ठाकरे गटाने पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केली.
पुण्यात बिनविरोध मार्ग मोकळा
पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे, भाजपचे बंडखोर प्रदीप कंद आणि महाविकास आघाडी समर्थित उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे यांचा विजय निश्चित झाला.
ठाणे, यवतमाळ, वर्ध्यात महायुतीला लाभ
ठाणे मतदारसंघात अभिजीत पवार यांच्या माघारीनंतर शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले.
यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे आणि सय्यद फारुख यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय निश्चित झाला.
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपचे अरुण लखाणी बिनविरोध निवडून आले.
नाशिकमध्ये थेट सामना कायम
नाशिक मतदारसंघात काही उमेदवारांनी माघार घेतली असली तरी शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते यांच्यात थेट लढत होणार आहे. हा सामना अत्यंत चुरशीचा मानला जात आहे.
सांगली, सातारा आणि इतर मतदारसंघांत तिरंगी लढती
सांगली-सातारा मतदारसंघात शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांच्या माघारीनंतर भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात तिरंगी सामना होणार आहे.
अमरावती, परभणी-हिंगोली आणि जळगावमध्येही बहुरंगी लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जळगावमध्ये चुरशीची लढत अपेक्षित
जळगाव मतदारसंघात अनेक बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली असली तरी लढत अजूनही चुरशीची राहणार आहे. येथे भाजपचे नंदकिशोर महाजन, ठाकरे गटाचे शरद तायडे, शिंदे गटाच्या रेश्मा काळे आणि अपक्ष अनिल चौधरी यांच्यात प्रमुख सामना होणार आहे.
सोलापूर, नांदेड, नागपूरमध्ये सरळ लढती
सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख आमनेसामने आहेत.
नांदेडमध्ये भाजपचे अमर राजूरकर आणि काँग्रेसचे रामदास पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे.
नागपूर पोटनिवडणुकीत भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात काट्याची लढत अपेक्षित आहे.
राजकीय समीकरणांवर परिणामाची शक्यता
अर्ज माघारीनंतर स्पष्ट झालेल्या चित्रानुसार महायुतीने अनेक मतदारसंघांत संघटनात्मक ताकद दाखवत बंडखोरीवर नियंत्रण मिळवल्याचे दिसून येते. तर महाविकास आघाडीला काही ठिकाणी उमेदवार माघारीचा फटका बसला आहे.
आता उर्वरित ११ मतदारसंघांतील मतदान अत्यंत निर्णायक ठरणार असून या निवडणुकीचे निकाल राज्यातील आगामी राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
