बिलाडी शिवारात धक्कादायक घटना; कानाजवळून गोळी गेल्याने मोठा अनर्थ टळला
नंदुरबार तालुक्यातील बिलाडी शिवारात उधारीचे पैसे परत न दिल्याच्या व शेतातील काम सोडल्याच्या कारणावरून एका मजुरावर बंदुकीने गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, संशयित आरोपीविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळीवाडा येथील रहिवासी पप्पू ऊर्फ संजय आनंदा वाघ (माळी) याचे बिलाडी शिवारात शेत आहे. एकतानगर येथील संजय मन्साराम ठाकरे हा त्याच्या शेतात मजुरीचे काम करत होता. दरम्यान, ठाकरे यांनी संजय माळी यांच्याकडून काही रक्कम उसने घेतली होती. ही रक्कम परत न करणे तसेच शेतातील काम सोडणे या कारणांवरून दोघांमध्ये काल दुपारी सुमारे १ वाजता जोरदार वाद झाला.
वाद चिघळल्याने संतापाच्या भरात संजय माळी याने बंदुकीतून गोळी झाडली. सुदैवाने गोळी संजय ठाकरे यांच्या कानाजवळून गेल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेत ते जखमी झाले असून त्यांच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखा तसेच शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून गोळीचे कव्हर जप्त केले असून तपास सुरू आहे.
या प्रकरणी संशयित आरोपी पप्पू ऊर्फ संजय आनंदा वाघ याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमांसह शस्त्र अधिनियम आणि SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार करीत आहेत.
दरम्यान, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहन केले आहे.
