दहा दिवसांत चौथ्यांदा दरवाढ; भाजीपाला, किराणा, दूध आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ
साईमत न्यूज नेटवर्क –
राज्यात मागील दहा दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मासिक बजेट कोलमडू लागले आहे. इंधन दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होत असून, त्यातून भाजीपाला, फळे, दूध, किराणा, खाद्यतेल, गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी घरगुती खर्चात महिन्याला दीड ते दोन हजार रुपयांची भर पडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १९, २३ आणि २५ मे रोजीही इंधन दरात वाढ करण्यात आल्याने सलग चौथ्यांदा नागरिकांना दरवाढीचा फटका बसला आहे. पुढील काही दिवसांतही इंधन दरवाढ कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने सर्वसामान्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
नाशिकमध्ये सध्या पेट्रोलचा दर ११२ रुपये ४७ पैसे प्रति लिटरपर्यंत पोहोचला असून, डिझेल ९९ रुपये ११ पैसे प्रति लिटर दराने विकले जात आहे. इंधन महागल्यामुळे आयात खर्च, वाहतूक आणि गोदाम व्यवस्थापनाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे बाजारातील बहुतांश वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
विशेषतः भाजीपाला आणि किराणा साहित्याच्या किमतीत गेल्या दहा दिवसांतच १५ ते २० टक्क्यांची वाढ झाल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. दूध वितरणाचा खर्च वाढल्याने दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीही वाढल्या आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात जवळपास हजार रुपयांपर्यंत वाढ झाल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक हॉटेल चालकांनी जेवणाचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढविले आहेत.
दरम्यान, डिझेल दरवाढीमुळे देशातील दळणवळण व्यवस्थेवरही मोठा परिणाम होत आहे. भाजीपाला, फळे, दूध, डेअरी उत्पादने, औषधे आणि एफएमसीजी वस्तूंच्या वाहतुकीचा खर्च वाढल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. तसेच उत्पादन साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स आणि ई-कॉमर्स डिलिव्हरी सेवाही महाग झाल्या आहेत. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
ट्रान्स्पोर्ट व्यवसायिकांनीही इंधन दरवाढीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या वाहतूक व्यवसायाला डिझेल दरवाढ परवडणारी नसल्याचे मत ट्रान्स्पोर्ट क्षेत्रातून व्यक्त होत आहे. या दरवाढीचा परिणाम आगामी काळात सर्वच वस्तूंच्या किमती वाढण्यात होणार असल्याने महागाईचा भडका आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
