लोखंडी रॉड, काठ्यांनी हल्ला २२ जणांवर गुन्हे
साईमत/पारोळा/ प्रतिनिधी :
तालुक्यातील भोलाणे येथे जुन्या शिवीगाळ व मारहाण प्रकरणात दाखल गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या असून एकूण २२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, भूषण अधिकार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी ते घराच्या ओट्यावर बसले असताना भोलाणे येथील हितेश पाटील, हर्षल पाटील, मोहीत पाटील, ललित पाटील, शुभम पाटील, अजय पाटील आणि नरेश पाटील यांनी लोखंडी रॉड, काठ्या व बॅट घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. “तू तुझ्या आईला केस मागे घ्यायला लाव” असे म्हणत आरोपींनी शिवीगाळ व धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
“कोर्टातून न्याय मिळेल” असे सांगितल्यानंतरही मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून या हल्ल्यात फिर्यादीला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या साडू आणि पत्नीवरही आरोपींकडून मारहाण झाल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूने अधिकार रामा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा शुभम पाटील किराणा सामान आणण्यासाठी गेला असताना संदीप पाटील व निलेश पाटील यांनी त्याच्याशी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. यानंतर वाद अधिक चिघळला.
यानंतर निलेश पाटील यांच्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, निलेश पाटील, संदीप पाटील यांच्यासह समाधान पाटील, आसाराम पाटील, सचिन पाटील, खुशाल पाटील, कुंदन पाटील, अधिकार पाटील, भूषण पाटील, उमेश पाटील, मुकुंदा पाटील, संतोष पाटील आणि योगेश पाटील यांनी मिळून शुभम पाटील यास लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या मारहाणीत मध्यस्थी करण्यासाठी आलेले फिर्यादी व हर्षल पाटील हे देखील जखमी झाले असून, पत्नीला मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्राचे नुकसान केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दोन्ही बाजूंच्या परस्पर तक्रारींनंतर पोलिसांनी एकूण २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
