साईमत न्यूज नेटवर्क –
नवी दिल्ली : देशभरात एकीकडे प्रचंड उष्णतेची लाट नागरिकांना हैराण करत असताना दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने मान्सूनबाबत दिलेल्या ताज्या अंदाजामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील २ ते ३ दिवसांत नैऋत्य मोसमी मान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता असून त्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन परिसर, अंदमान समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये मान्सूनच्या पुढील प्रगतीस पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सूनचे आगमन लवकरच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर मान्सून महाराष्ट्रासह इतर राज्यांकडे सरकणार आहे.
गेल्या २४ तासांत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार बेटे, केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आसाम आणि मेघालयमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून किनारपट्टीवरील कर्नाटकातही मुसळधार पाऊस कोसळला.
दरम्यान, हवामान विभागाने केरळ, माहे, लक्षद्वीप, तामिळनाडू आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये धुळीचे वादळ, मेघगर्जना आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशातील तब्बल २७ राज्यांमध्ये ३० मेपर्यंत हलका ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गोवा आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांचा समावेश आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारेही वाहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, उत्तर आणि मध्य भारतातील अनेक राज्यांना उष्णतेचा फटका बसत आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, झारखंड, तेलंगणा आणि पश्चिम बंगालसह १५ राज्यांमध्ये ३० मेपर्यंत तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दिवसा उष्ण वारे आणि रात्री दमट वातावरणामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून, नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
