साईमत न्यूज नेटवर्क –
पिंपरी-चिंचवड : शहरात खळबळ उडवणाऱ्या ‘ए. जे. फर्निचर मॉल’ गोळीबार प्रकरणाचा पोलिसांनी मोठा उलगडा केला असून, बिश्नोई गँगशी संबंधित तीन शूटरना उत्तराखंडमधील हरिद्वार येथून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे देशभरातील गुन्हेगारी कनेक्शनचे धागेदोरे समोर आले आहेत.
१५ मे २०२६ रोजी रात्री रावेत-ताथवडे बीआरटी मार्गावरील ‘ए. जे. फर्निचर मॉल’ बाहेर मॉलचे मालक जगदीश बिश्नोई बसलेले असताना दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी त्यांच्यावर ५ ते ६ गोळ्या झाडल्या. सुदैवाने ते या हल्ल्यात बचावले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
तपासात समोर आले की, ७ मे रोजी अशोक कुमार बिश्नोई यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉलद्वारे २ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही मागणी पूर्ण न झाल्यानेच हा गोळीबार घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी ७ विशेष पथके तयार केली होती. तब्बल ३५० ते ४०० सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. त्यानंतर हरियाणा मार्गे उत्तराखंडमधील हरिद्वार येथील लॉजमध्ये छापा टाकून तिन्ही शूटरना अटक करण्यात आली.
चौकशीत आरोपींनी बिश्नोई गँगशी संबंधित आरजू बिश्नोई, शुभम लोणकर आणि कुलदीप उर्फ कशीश यांच्या सांगण्यावरून हा हल्ला केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, कुलदीप उर्फ कशीश हा सिद्धू मूसेवाला हत्याकांडाशी संबंधित असल्याचेही तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात आणखी काही व्यापाऱ्यांना धमक्या देण्यात आल्याची माहिती समोर आली असून, बिश्नोई गँग पुणे परिसरातील व्यावसायिकांना लक्ष्य करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना २८ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
