बोदवड पोलीस ठाण्यातील हलगर्जीपणा उघड; तिघांवर निलंबनाची कारवाई
साईमत/बोदवड/ प्रतिनिधी :
बोदवड तालुक्यात घडलेल्या हत्या प्रकरणानंतर पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि निष्क्रियता आढळल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक (API)सह तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर, एएसआय रवींद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे. विभागीय चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
तणाव वाढत गेला, पण प्रतिबंधात्मक कारवाई नाही
चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, बोदवड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका वादातून दोन्ही गटांतील तणाव दिवसेंदिवस वाढत होता. परिस्थिती गंभीर होत असल्याचे संकेत मिळूनही आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.
या निष्काळजीपणामुळे वाद विकोपाला गेला आणि अखेर त्याचे रूपांतर हत्या घटनेत झाल्याचे चौकशीत नमूद करण्यात आले आहे.
घटनास्थळी पोहोचूनही कारवाई अपुरी
एएसआय रवींद्र गुरचळ यांनी वादानंतर घटनास्थळी भेट दिली होती. मात्र संबंधितांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पुढील कठोर कायदेशीर कारवाई न करता त्यांना सोडून देण्यात आले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्याची महत्त्वाची संधी गमावल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
वरिष्ठांना माहिती न देणे ठरले महागात
प्रभारी अधिकारी दीपक सुरवडकर यांना वादाची माहिती फोन व व्हॉट्सअॅपद्वारे देण्यात आली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही परिस्थिती संवेदनशील असल्याचे कळवले होते. तरीदेखील त्यांनी तातडीने ठोस कारवाई केली नाही किंवा वरिष्ठ अधिकारी व कंट्रोल रूमला वेळेत माहिती दिली नाही, असे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
निष्क्रियतेमुळे परिस्थिती बिघडली
हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे प्रतिबंधात्मक कारवाईची जबाबदारी होती. मात्र त्यांनी आवश्यक चौकशी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या तिघांच्या निष्क्रियतेमुळे कायदा व सुव्यवस्था ढासळली आणि दुर्दैवी हत्या घडल्याचे विभागीय अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तिन्ही जणांना तडकाफडकी निलंबित करून पुढील विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
