‘फार्मफ्रेस’ कंपनी हटवा; नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे रहिवासी भागात सुरू असलेल्या रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित कंपनीचा परवाना तात्काळ रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. ‘फार्मफ्रेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केला आहे. तसेच कंपनीला निवासी भागातून हटवून औद्योगिक क्षेत्रात स्थलांतरित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील गट क्रमांक १०३६ मधील प्लॉट क्रमांक ३७ व ३८ येथे संबंधित कंपनीकडून फळांवर रासायनिक प्रक्रिया करून ज्यूस निर्मितीचा व्यवसाय सुरू आहे. या प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या रसायनांमुळे परिसरात गोडसर पण तीव्र उग्र वास पसरत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. या दुर्गंधीमुळे अनेकांना श्वसनाचे त्रास, फुफ्फुसांशी संबंधित विकार आणि इतर आरोग्य समस्या उद्भवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कंपनीमधून दररोज मोठ्या प्रमाणावर सांडपाणी परिसरातच सोडण्यात येत आहे. हे दूषित पाणी साचून राहत असल्याने दुर्गंधी वाढत असून डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी परिसरातील लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय त्वचारोग आणि अंगाला खाज सुटण्याच्या तक्रारीदेखील वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर जागेला रहिवासी वापरासाठी अकृषक परवाना देण्यात आलेला असताना त्या ठिकाणी औद्योगिक व्यवसाय सुरू ठेवणे हे नियमबाह्य असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. निवासी भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या उद्योगाविरोधात प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कंपनीचा परवाना रद्द करून संबंधित उद्योगाला औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव जागेत स्थलांतरित करण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, या प्रश्नावर प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर पंकज शामकांत महाजन, रविंद्र संतोष चौधरी, राहुल सुरेश चौधरी, निवृत्ती वासुदेव कोळी, वैभव संजय गोसावी, मुरलीधर गोविंदा पवार, भूषण कांतीलाल साळुंके, संदीप आनंदा धनगर, भूषण भानुदास कोल्हे, संदीप विष्णू पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
