दहिगावात डेंग्यूविरोधी जनजागृती मोहीम, गप्पी माशांचा वापर
साईमत/यावल/ प्रतिनिधी :
तालुक्यातील दहिगाव येथे आज, दि. १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस उत्साहात आणि जनजागृतीच्या प्रभावी उपक्रमांसह साजरा करण्यात आला. डेंग्यू व हिवताप या आजारांविरोधात प्रतिबंधात्मक उपायांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी तसेच तालुका हिवताप पर्यवेक्षक विजय नेमाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांमध्ये डेंग्यू व हिवताप प्रतिबंधाबाबत सविस्तर जनजागृती करण्यात आली. पाणी साठवणीची भांडी नियमित तपासणे, परिसर स्वच्छ ठेवणे तसेच पाण्याची भांडी झाकून ठेवणे याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. “स्वच्छ करा आणि झाकून ठेवा, डेंग्यूला हरवण्यासाठी उपाय करा” असा प्रभावी संदेश यावेळी देण्यात आला.
डेंग्यू नियंत्रणासाठी जैविक उपाययोजनांवर विशेष भर देत गप्पी माशांचे महत्त्व ग्रामस्थांना समजावून सांगण्यात आले. डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले, ज्यामुळे नैसर्गिक पद्धतीने डास नियंत्रण साध्य होण्यास मदत होणार आहे.
यासोबतच नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधाविषयी माहितीपर हस्तपत्रिकांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात आरोग्यसेवक मो. हनीफ तडवी तसेच आशा सेविकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे दहिगाव परिसरात डेंग्यू प्रतिबंधाबाबत जागरूकता वाढीस लागली असून ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
