शाळा-महाविद्यालयांमध्ये आता सुरक्षा जनजागृती मोहिम
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाच्या २०२२ च्या निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यात पोलिस अधीक्षक स्तरावर महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीची पहिली बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत पॉक्सो कायदा, सायबर गुन्हे तसेच महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून जिल्ह्यात व्यापक जनजागृती मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा पोलिस प्रशासनाच्या पुढाकारातून गठीत करण्यात आलेल्या या समितीत पोलिस अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, विधिज्ञ, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांचे सदस्य सहभागी आहेत. जळगावचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलिस उपअधीक्षक प्रदीप ठाकूर आणि भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक कल्याणी पाटील या सचिव म्हणून कार्यभार पाहणार आहेत.
समितीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश
या समितीत डॉ. रेणुका चव्हाण, अॅड. अनुराधा एल. वाणी, अॅड. भारती कुमावत, कांचन नारखेडे, प्रतिभा सूर्यवंशी, राजश्री महाजन, विद्या सोनार आणि भाग्यश्री सोनवणे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील अनुभव एकत्रित करून महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात येणार आहे.
शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम
बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यात बालकांवरील गुन्हे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कायदेशीर कारवाईबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
२५ ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन
जळगाव शहरात लवकरच २५ ठिकाणी पॉक्सो कायदा आणि सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृतीपर पथनाट्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
एकसंध शैक्षणिक साहित्य तयार होणार
जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांसाठी एकसमान पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करण्यात येणार आहे. यात सायबर सुरक्षा, महिला अत्याचार प्रतिबंध, पॉक्सो कायदा आणि वैयक्तिक सुरक्षिततेबाबत माहिती दिली जाणार आहे.
दामिनी पथकांची गस्त वाढविणार
बैठकीत दामिनी पथकांच्या कामकाजावरही चर्चा झाली. शाळा आणि महाविद्यालय परिसरात या पथकांची गस्त वाढविण्यात येणार असून, छेडछाडीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सक्रिय पावले उचलली जाणार आहेत.
पोलिस दादा-दीदींसाठी कार्यशाळा
येत्या १८ तारखेला सकाळी १० वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील ‘पोलिस दादा’ आणि ‘पोलिस दीदी’ यांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यात विद्यार्थ्यांशी संवाद, महिला सुरक्षा आणि जनजागृतीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात असून, या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
