साईमत / नाशिक
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला अत्यंत कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. एका शेतकऱ्याच्या कांद्याला अवघा ५० पैसे किलो म्हणजेच ५० रुपये क्विंटल इतका अत्यल्प दर मिळाल्याने त्याने संतापाच्या भरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू असताना शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनासाठी मिळालेला दर ऐकून तो मानसिक तणावात गेला. ज्या पिकासाठी महिनोन्महिने मेहनत आणि मोठा खर्च केला, त्या कांद्याला इतका कवडीमोल भाव मिळाल्याने तो हताश झाला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर बाजार समिती परिसरात एकच खळबळ उडाली असून उपस्थित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने हालचाली करण्यात आल्या.
दरम्यान, कांद्याचे सतत घसरत असलेले बाजारभाव आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत मिळणारा अत्यल्प दर शेतकऱ्यांचा संताप वाढवत असून राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये अशाच प्रकारचा असंतोष दिसून येत आहे.
शेतकरी संघटनांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया देत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव किंवा अनुदान जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.
