साईमत पाचोरा जळगाव:
बाबरूड (ता. पाचोरा) येथील चित्रपट सेना जिल्हाध्यक्ष कांचन पाटील यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर Maharashtra Navnirman Sena च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलत कांचन पाटील यांची पाचोरा येथील रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
पक्षाचे नेते श्री अविनाश भाऊ जाधव यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी रुग्णालयात जाऊन कांचन पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी “पक्ष तुमच्या पूर्णपणे पाठीशी आहे” असा विश्वास देत त्यांना धीर दिला. या भेटीमुळे पाटील कुटुंबाला मोठा आधार मिळाला.
दरम्यान, या प्रकरणाबाबत पाचोरा पोलिस अधिकाऱ्यांशीही चर्चा करण्यात आली असून घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या वेळी पाचोरा तालुका अध्यक्ष नाना ठाकरे, जळगाव शहर उप महानगर अध्यक्ष ललित शर्मा, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ ठाकरे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण विठ्ठल दुंदुले, तालुका संघटक जितेंद्र भाऊ नाईक, श्याम भाऊ राजपूत, विद्यार्थी सेना तालुका संघटक संदीप चौधरी तसेच इतर पदाधिकारी आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
